पनवेल : वार्ताहर
वाढत्या प्रवासी संख्येमुळे पनवेल रेल्वेस्थानकावर असलेले पादचारी पूल कमी पडू लागले आहेत. पुलावर होणारी गर्दी पाहता पनवेल रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसप्रमाणे पनवेल रेल्वेस्थानकाचा विकास केला जाणार आहे. पनवेल रेल्वेस्थानकामध्ये सध्या सात फलाट आहेत. त्यातील चार उपनगरी, तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. सध्या पनवेल रेल्वेस्थानकाचा विकास नवीन टर्मिनस म्हणून करण्यात येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढून फलाटांची संख्यादेखील 12वर पोहचणार आहे. तसेच या नव्या टर्मिनसवरून सीएसएमटी, दादर, मुंबई सेंट्रल, तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसप्रमाणे पनवेल येथूनसुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्या धावणार आहेत. या सुविधेमुळे नवी मुंबई, पनवेलमधील नागरिकांना आता कल्याण, ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही. तसेच दादर, सीएसएमटी, कल्याण, एलटीटी स्थानकांवरील भार कमी होणार आहे. पनवेल आणि परिसराचा विकास व विस्तार लक्षात घेऊन या स्थानकात अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कामासाठी सिडकोचा 67, तर रेल्वेचा 33 टक्के सहभाग आहे. त्यातूनच नव्या पादचारी पुलाची उभारणी होणार आहे. प्रत्येक फलाटावर सरकते जिने व नव्या पादचारी पुलावरून फलाटावर उतरण्यासाठी सरकत्या जिन्यांची सोय असणार असून, पाच आणि सात फलाटांना जोडणार्या जुन्या पादचारी पुलाला दोन ठिकाणी उद्वाहक (लिफ्ट)चे काम सुरू आहे.