पनवेल : नितिन देशमुख : कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येत असून, यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. तेथे क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरु असून, या वर्ष अखेर ते पूर्ण होईल. सुधारित स्थानकात प्रतीक्षा गृह, आरक्षण कक्ष व इतर सुविधांचा समावेश करण्यात आला असल्याने इंदापूरचे महत्व वाढणार आहे.
माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी 44 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या वाढत असल्याने क्रॉसिंगची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागतो. याची दखल घेऊन पाच नवीन क्रॉसिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर, सापे व वामने तर रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली स्टेशनाचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील इंदापूर, गोरेगाव रेल्वे स्टेशन गैरसोईनी युक्त आहेत. या ठिकाणी कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या स्टेशनचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रायगडमधील इंदापूरचा व रत्नागिरीतील वेरवली स्टेशनचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. जलद व आरामदायी प्रवासासाठी क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये स्टेशन रूपांतरण व ऑपरेशन सुविधांचा समावेश आहे. मात्र गोरेगाव स्टेशनाचा दर्जा सुधारण्यासाठी समावेश नसल्याने गोरेगावकरानी नाराजी व्यक्त केली आहे.
कोलाड आणि माणगावच्या यामध्ये इंदापूर रोड स्टेशन आहे. त्यावर आत्तापर्यंत 14.58 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तेथे आता क्रॉसिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे. वीर व करंजाडी या स्टेशनमध्ये असलेले सापे इंदापूर स्टेशनपासून 55 किमी अंतरावर आहे. त्याठिकाणी व वामने येथेही क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली स्टेशन साठी 15.03 कोटी खर्च झाला असून तेथेही क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या स्थानकात प्रतीक्षा गृह,आरक्षण व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे.
ना. सुरेश प्रभू लोकसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना कोकण रेल्वे प्रवाशांना येणार्या अडचणी माहीत होत्या. त्यांनी कोकणी माणसाचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, विद्युतीकरण व 11 नवीन स्थांनकांच्या बाधकामाचा निर्णय आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतला होता. त्यानुसार या रेल्वे मार्गाचे रोह्यापर्यंत दुपदरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यापुढेही दुपदरीकरणाचे काम सुरू आहे.