पनवेल/कामोठे ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तरुण तुर्क उमेदवार शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत व तेजस कांडपिळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रभाग समित्यांचा कारभार आता प्रथमच युवकांच्या हाती आला आहे.
प्रभाग सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. सकाळी 11 वाजता आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. या वेळी विरोधी पक्षाकडून कोणीही अर्ज दाखल न केल्याने सत्ताधारी भाजपचे शत्रुघ्न काकडे प्रभाग ‘अ’मधून बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. प्रभाग ‘ब’मध्ये संजय भोपी, प्रभाग ‘क’मध्ये गोपीनाथ भगत व प्रभाग ‘ड’मध्ये तेजस कांडपिळे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभापती दर्शना भोईर, विद्या गायकवाड, मनोज भुजबळ, बावीस्कर, नगरसेवक संतोष शेट्टी, अनिल भगत, मुग्धा लोंढे, आरती नवघरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. चारही सभापतींनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सभापतिपदाच्या निवडीनंतर आपल्यालाही संधी दिल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सर्व सभापतींनी आभार मानले.
-प्रभाग ‘अ’मध्ये कचर्याची समस्या नाही. रस्ते, गटार आणि पाणी समस्या सोडवण्याकडे विशेष लक्ष देणार आहे. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व सहकारी नगरसेवकांना सोबत घेऊन मी काम करणार आहे.
-शत्रुघ्न काकडे, प्रभाग ‘अ’ सभापती
-प्रभागाच्या विकासासाठी माझ्या सहकारी नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. प्रभागातील गावे-वाड्या यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार आहे. माजी सभापती एकनाथदादा गायकवाड यांचे मार्गदर्शन घेऊन प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन.
-संजय भोपी, प्रभाग ‘ब’ सभापती
प्रभाग ‘ड’मधील पाणी, रस्ते आणि गटाराच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असून, त्यासाठी आपल्या प्रभागातील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आमच्या नेत्यांनी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल.
-तेजस कांडपिळे, प्रभाग ‘ड’ सभापती