Breaking News

गणेशोत्सवापूर्वी होणार प्राथमिक शिक्षकांचे पगार

शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश; शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहेत. 29ऑगस्ट रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे नियोजन आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे राजिप शिक्षण विभागाने शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले.

शिक्षकांना भेडसावणार्‍या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या मुद्यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांची भेट घेतली. या वेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

शिक्षण सेवकांचा कालावधी 13 सप्टेंबर 2022 अखेर पूर्ण होत असल्याने त्यांचे प्रस्ताव गटाकडून तातडीने माहितीसह जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी मागविण्यात यावेत, ही मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर सीईओ किरण पाटील व शिक्षणाधिकारी गुरव यांनी, संबंधितांना तातडीचे आदेश दिले जातील, असे आश्वासन दिले. तसेच जो पूर्वीचा  प्रस्ताव नमुना आहे, त्या प्रमाणे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

स्थायीत्व प्रमाणपत्र प्रस्ताव गटाने अद्यापही पाठवलेली नाहीत, संघटनेच्या प्रतिनिधींनी पंचायत समिती स्तरावर जे प्रस्ताव प्राप्त झालेले असतील ते पाठवण्याची व्यवस्था करावी, त्यांना तातडीने मान्यता देण्यात येईल. तसेच आवश्यक असणारे गोपनीय अहवाल लगतच्या मागील तीन वर्षाचे जोडावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

शिक्षकांची प्रलंबित असणारी वैद्यकीय बिले, फंडाची प्रकरणे या संदर्भात या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव प्रत्येक गटाने तातडीने पाठवावेत जेणेकरून वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव निकाली काढणे प्रशासनाला सोयीचे होईल, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

महाड तालुक्यातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचे मागील वर्षीच्या महापुरात नुकसान झाले आहे. या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाड पंचायत समितीचे लेखनिक गोलार यांच्याशी फोनवरून चर्चा करून संबंधितांना तातडीने माहिती पाठविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

शिक्षण सेवकांच्या तारखेविषयीचे संभ्रम दूर करण्यासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांनी तातडीने पत्र काढून संबंधिताना तसे लेखी कळवले आहे. शिक्षण सेवकांनी 25 तारखेपूर्वी आपले तारखेबाबतचे वैयक्तिक अर्ज, प्रस्ताव दिलेल्या विहित नमुन्यात माहितीसह पंचायत समिती स्तरावर सादर करावे. जेणेकरून तीन वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होईपर्यंतच्या आत त्यांचा तारखेचा प्रश्न निकाली काढण्यात प्रशासनाला सोयीचे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, जुन्या शिक्षक पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार रसाळ, वैभव पिंगळे , विजय येलवे, विकास नाडेकर, गणेश भोये, विनोद तुपे, भूषण जाधव , चंद्रकांत बैसाने, भूमी  चौरे, मनीषा चिकने आदि या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply