रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक
रेवदंडा : प्रतिनिधी
गणेशोत्सव शांततेने व सुरक्षीतपणे साजरा करण्याचे आवाहन रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी नुकताच पोलीस ठाण्यात आयोजीत केलेल्या नगारिकांच्या विशेष सभेत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायकांळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलीस निरीक्षक अशोक थोरात उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. या वेळी पोलीस निरीक्षक थोरात यांनी गणेशोत्सवात शांतता व सुरक्षीततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या दक्षतेबाबत उपस्थितांशी चर्चा केली. तर गणेशोत्सवात येत असलेल्या विविध समस्या व अडचणींबाबत उपस्थितांनी अशोक थोरात यांना दिली.
गणेश विसर्जन यात्रेच्या दिवशी रेवदंडा पारनाका परिसरात वाहतूक कोंडी होते, ती टाळण्यासाठी त्या दिवशी सायकांळी चौल नाका व मोठे बंदर येथून रेवदंडा बाजारपेठ रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा, व ती वाहतूक रेवदंडा बायपास मार्गाने वळवावी, अशी सूचना सुहास घोणे यांनी या सभेत केली. त्याबाबत पोलीस निरीक्षक थोरात यांनी नियोजन करण्याचे आश्वासन या वेळी दिले.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, ग्रामरक्षक दल, सागर सुरक्षा दल यांचे प्रतिनिधी तसेच पोलीस पाटील, पत्रकार, समाज अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष आणि प्रतिष्ठीत नागरिक या विशेष सभेला उपस्थित होते.