रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेला ग्रामपंचायत हद्दीतील महिला व युवतींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. खांबेरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेत इंटिमेशन दागिने बनविणे, ब्रॉचेस तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. सरपंच गिता वारगुडे, उपसरपंच जयश्री जोशी, ग्रामपंचायत सदस्या मयुरी मोरे, दिप्ती गिजे, मनिषा फळसकर या वेळी उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सदस्य आतिष गिजे, ग्रामसेवक आर. पी. पाटील यांनी या कार्यशाळेला भेट देऊन प्रशिक्षणार्थी महिलांना प्रोत्साहन दिले. खांबेरेसारख्या दुर्गम भागातील महिलांना या कार्यशाळेमुळे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या असल्याचे मत प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केले.