Sunday , February 5 2023
Breaking News

पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी
पेगॅसस या फोन हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांवर पाळत ठेवली जात आहे, असा दावा काही मोठ्या मिडिया हाऊसेसने केला. यात भारतातील राजकीय नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचेही फोन टॅपिंग झाल्याचा दावा करण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ हा दावा फेटाळून लावला, पण विरोधकांनी यावरून संसदेत गदारोळ केला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण म्हणजे भारताला जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे, अशी भूमिका मंगळवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत मांडली.
फडणवीस म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून त्यात काहीतरी वाद किंवा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वजातीय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. सर्वांना आपले गुण दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे. या गोष्टींवरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काही कपोलकल्पित बातम्या पेरून संसेदच्या कामकाजात विघ्न आणण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे.
पेगॅससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, पण चर्चा फक्त भारताची केली जात आहे. ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशी बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. असे लक्षात येत आहे की, जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा काही लोक वेगळ्या हितसंबंधांमुळे भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलेय की सरकार कोणत्याही एजन्सीच्या माध्यमातून अनधिकृत हॅकिंग करीत नाही. मध्यंतरीच्या काळात काही माध्यमांना चीनकडून फंडिंग मिळाल्याचे लक्षात आले. ते भारतविरोधी प्रचार करीत होते. त्यामुळे भारत सरकारने टेलिग्राफ अ‍ॅक्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, जून 2006मध्ये मनमोहन सरकार टॅपिंग करीत असल्याचा आरोप झाला होता. तेव्हा हे कृत्य सरकारने नव्हे तर खासगी कंपनीने टॅप केले असे सांगत एकाला अटक करण्यात आली होती. बंगालमध्येही असाच आरोप केला गेला होता, पण त्या वेळी मनमोहन सिंग यांनी जेपीसी करायची गरज नाही. अधिकृत काम झाले. अनधिकृत काम झालेले नाही, असे सांगितले होते.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply