कर्जत : बातमीदार
कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील अन्य गुणवंतांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माथेरान नगर परिषदेकडून सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता माथेरानमध्ये रुग्णांवर उपचार करणार्या डॉ. रुपाली मिसाळ आणि आरोग्यसेविका स्नेहा गोळे यांना पंत्रप्रधान कार्यालयाने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्यासह नगर परिषदेच्या बी. जे. रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वनिता दिघे, राजेश वाघेला, सदानंद इंगळे तसेच कोरोना काळात काम करणारे स्थानिक धीरज सावंत, किशोर कोकळे, निमेश मेहता, किशोर मोरे, वैष्णवी चव्हाण, प्राजक्ता शिंदे, रेशमा काळे, तन्वी दिघे, अंगणवाडी सेविका शबाना महापुळे, स्मिता गायकवाड, रमा आखाडे यांना माथेरान नगर परिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त नुकतेच शाल, श्रीफळ देऊन गौरविले. माथेरान नगर परिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे शिंदे, महसूल अधिकारी दीक्षांत देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्यासह नागरिक या वेळी उपस्थित होते.