कर्जत : बातमीदार
माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू असून काही कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी नगर परिषद प्रशासन आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. 27) माथेरान नगर परिषदेला भेट दिली.
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन असून तेथील पॉईंट, रस्ते यांचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यातील काही कामे सुरू होऊन पूर्ण झाली तर काही प्रस्तावित आहेत. त्यांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर परिषद प्रशासन आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी नगर परिषद कार्यालयात आले. त्यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे व नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
माथेरान नगर परिषदेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजेत, हेरिटेज वास्तुमुळे पर्यटकांच्या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न मिळू शकते, असे सांगून डॉ. कुलकर्णी यांनी प्रत्येक विकासकामाचा आढावा घेतला. लेखापाल अंकुश इचके, अभियंता स्वागत बिरंबोळे, स्वच्छता अधिकारी अभिमन्यू एळवंडे, अन्सार महापुळे, अव्वल लिपिक रत्नदीप प्रधान यांच्यासह नगर परिषद कर्मचारी या वेळी उपस्थित होते.