अलिबाग : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे, याकरिता अलिबाग एसटी आगारातून 29 ऑगस्ट रोजी सकाळी सावंतवाडी बस सोडण्यात येणार आहे.
अलिबाग एसटी आगारातून दरवर्षी गणेशोत्वासासाठी सावंतवाडी बस सोडली जात असे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षे अलिबागमधून सावंतवाडी बस सोडण्यात आली नव्हती. यंदा सावंतवाडी बस सोडावी, अशी मागणी केली जात होती. त्याचा विचार करून सावंतवाडी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलिबाग एसटी आगारातून अलिबाग-सावंतवाडी या मार्गावर 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता शिवशाही बस सोडण्यात येणार आहे. ही बस वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, कणकवली मार्गे जाईल, अशी माहिती अलिबाग आगार व्यवस्थापकांनी दिली. अलिबाग आगारातून सावंतवाडी बस सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गणेशभक्तांनी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत.
अलिबाग-सावंतवाडी बस एकच दिवस (दि. 29) सोडण्यात येणार आहे. परंतु या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी जास्त आहेत. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजीदेखील अलिबाग-सावंतवाडी बस सोडावी, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.