नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण दोन वर्षांपासून रखडले आहे. दरम्यान, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पाली बस स्थानकाच्या नूतनीकणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालीतील एसटी बस स्थानकाची मोडकळीस आलेली जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरीदेखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही.
ठेकेदाराने काम पूर्णपणे थांबविल्यामुळे या स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. या बस स्थानकाचे नूतनीकरण व विविध समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ हे परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करत आहेत. मागील महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर आणि रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी पाली बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी जुन्या ठेकेदाराला हटवून नवीन निविदा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार जुन्या ठेकेदाराला हटवून नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे भिलारकर यांनी सांगितले.
पाली बस स्थानक नुतनीकरणाचा जुना ठेका रद्द करण्यात आला असून, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. निधीदेखील वाढविण्यात येणार आहे. मात्र आराखडा तोच राहणार आहे.
-विद्या भिलारकर, कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन महामंडळ-मुंबई प्रदेश
RamPrahar – The Panvel Daily Paper