Breaking News

बाप्पाच्या आगमनाचे सार्‍यांनाच वेध; बाजारपेठा सजल्या

कोरोनामुक्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी

अलिबाग : प्रतिनिधी
गणपती बाप्पाच्या आगमनाचे सार्‍यांनाच वेध लागले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच गणेशोत्सव मुक्तपणे साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह असून जिल्ह्यातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने  सजल्या आहेत.
गणरायाची आरास करण्यासाठी कागदी फुलांच्या माळा, मखमली टिकली वर्कचे पडदे, कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, गणरायासाठी छत्र तसेच पेशवाई, पुणेरी व शिंदेशाही पगड्या बाजारात  उपलब्ध आहेत. कापडी मंडप व स्क्रीन पेंटिंगची आसने आणि तरंगते दिवे, रांगोळी आदी साहित्यही विक्रीस आहे. पुठ्ठ्यापासून, जाड कागदापासून व पडद्यापासून बनविलेली मखरे फोल्ड करणारी असल्याने गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा बंद करून ठेवली जाऊ शकतात. त्यामुळे या मखरांना ग्राहकांची मागणी वाढलेली आहे.
एलईडी इंडियन, एलईडी माळा, डमरू माळ, चेरीलाइट अशा विद्युत माळांही उपलब्ध आहेत. चीनच्या वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत असून अनेक विक्रेत्यांनी चायनीज माल विक्रीसही ठेवलेला नाही. आकर्षक कागदी व फायबर मखरे, गौरीकमळ, फुलोरा, सिंहासन यांना नेहमीप्रमाणे मागणी आहे.  200 रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, साड्या आणि विविध प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत.
इकोफ्रेंडली मखरांना पसंती
यंदा कारागिरांनी पुठ्ठा, कागद, कापड यापासून इकोफ्रेंडली मखरे तयार केली आहेत. या मखरांमध्ये सिंहासन, मंदिर, निसर्ग मखर, पाळणा, पुष्प सजावट मखर, महाल यांसारखी आकर्षक मखरे बाजारात विक्रीस ठेवण्यात आली आहेत. याची किंमत दोन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यत आहेत. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसारही मखरे बनवून दिली जात आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply