कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाच्या आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त कामगार भरण्यात आले आहेत. या अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात यावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्यांनी नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत.
मुंबईचे उपनगर म्हणून नेरळ विकसित होत आहे. शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावातील नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. नवीन बांधकामांचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठी शासनाच्या नगररचना विभागाने नेरळ गावाकरिता स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. नेरळ गावात सध्या 25 हजाराच्या आसपास लोक राहत असून मोठ्या नागरी वस्त्या नव्याने निर्माण होत आहेत. येथील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि प्रशासनाचा कारभार हाकण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहून अधिक कामगार काम करीत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतसाठी शासनाने आकृतिबंध ठरवून दिला आहे. त्या आकृतिबंधापेक्षा जास्त कामगार कार्यरत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीने तीन वर्षांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेकडून नेरळ ग्रामपंचायतीमधील अतिरिक्त कामगारांची कपात करण्याबाबत सातत्याने पत्र व्यवहार केला जात होता. आता अतिरिक्त कामगारांना कमी करावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेने नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत.