Breaking News

बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे पुढे नेताहेत -ना. सामंत

कर्जतमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा

कर्जत : प्रतिनिधी

आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे याची घोषणा आपल्या शिंदे सरकारने केली. आता स्थानिकांवर अन्याय होणार नाही. बाळासाहेबांची खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढवित, पुढे नेत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात ना. उदय सामंत मार्गदर्शन करीत होते. आम्ही संयमशील आहोत, पण त्यालाही मर्यादा आहेत. आता अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी विरोधकांना दिला. सुरुवातीला आदिवासी भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात झाली. कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप आणि खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष भोईर यांनी प्रास्ताविक केले. महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे आणि उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी शिंदे गटाला समर्थन केल्याबद्दल त्यांचा या वेळी ना. उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विसंगाशी संग करून 2019 साली आघाडी सरकार सत्तेवर आले होते. शिवसेनेचे तीन आमदार होते, मात्र   राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असताना पक्ष प्रमुखांनी त्यांना पालकमंत्री केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी झाली आणि आम्ही 50 आमदारांनी ऐतिहासिक उठाव केला. आज दोन महिन्यानंतर मी पूर्ण समाधानी आहे, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी या वेळी स्पष्ट केले. मी आतापर्यंत 400 ते 450 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा, असे आवाहन आमदार थोरवे यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही उठाव केला. आम्ही दुसरा पक्ष काढला नाही किंवा कोणत्या पक्षात गेलो नाही. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे 200 आमदार निवडून येतील, असा विश्वास पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनी भाजपबरोबर युती केली, त्या वेळी महाराष्ट्रात भाजपची ताकद नव्हती, पण त्यांनी तो विचार केला नाही. हिंदुत्वासाठी त्यांनी आपल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसळ, सुषमा ठाकरे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, संतोष भोईर, मनोहर थोरवे, विजय पाटील, उल्हास भुर्के, पंकज पाटील, परेश पाटील, रमेश मते, दिलीप ताम्हाणे, उत्तम शेळके, हरीश काळे, विकास बडेकर, चंद्रकांत चौधरी, संकेत भासे, रत्नाकर बडेकर, प्रभाकर देशमुख, केतन पोतदार, किसन शिंदे, जान्हवी साळुंके, दीपक भोईर, रामचंद्र मिनमीणे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply