Breaking News

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार

रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ घडवण्यासाठी भव्य निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील रामशेठ ठाकूर मैदानात होणार आहे. या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुनवीर, राज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने नेहमीच ताकद दिली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रौढ महिला व पुरुष कबड्डी खेळाडूंकरिता ही स्पर्धा जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्वरूपात घेतली जाणार असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे विशेष महत्त्व आहे. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता जिल्ह्यातील 198 पुरुष कबड्डी संघ आणि 32 महिला संघांची नोंदणी झाली आहे. त्या अनुषंगाने 2772 पुरुष आणि 448 महिला असे एकूण 3220 खेळाडू सहभागी होणार आहेत. 198 कबड्डी संघांमधून पुरुष संघातून संभाव्य 20 खेळाडूंची, तर 32 महिला संघामधून संभाव्य 20 महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यातून निवड झालेला 14 पुरुष खेळाडूंचा संघ व 14 महिला खेळाडू संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या दोन्ही संघांचा मार्गदर्शक सराव शिबिरसुद्धा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे याच मैदानावर घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकतेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या 100 पंचांचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर पार पडले.
प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि चुरशीच्या सामन्यांची क्रीडारसिकांना पर्वणी असणार आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा महिला व पुरुष सक्षम संघ मिळणार आहे. त्यामुळे हि निवड चाचणी स्पर्धा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून खेळाडू व प्रेक्षकांना या स्पर्धेचा लाभ व्हावा, यासाठी नियोजनाचा संपूर्ण आढावा खुद्द लोकनेते रामशेठ ठाकूर घेत आहेत.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply