Breaking News

दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन

पेण ः प्रतिनिधी
ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत भाविकांच्या घरी गणरायांचे आगमन झाले. त्यानंतर गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. पेणमध्ये विविध ठिकाणी नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. विसर्जनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले होते. दुपारनंतर सर्वत्र दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावली, मात्र विसर्जनाच्या दिवशी विश्रांती घेतली. पेणमधील भोगावती नदी, कासार तलाव, तसेच ग्रामीण भागात तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कासार तलाव येथे पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे, भोगावती नदीवर तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कर्जत ः कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक व खासगी अशा सुमारे नऊ हजारांपेक्षा जास्त श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापैकी 2,181 दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन गुरुवारी (दि. 1) करण्यात आले. यामध्ये केवळ दोन गणपती सार्वजनिक होते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे विसर्जन करतानाही निर्बंध होते, मात्र यंदा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात विसर्जन करण्यात आले. दुपारी चार वाजल्यापासून विसर्जनाची सुरुवात झाली. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1237 खासगी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 812 खासगी, सहा सार्वजनिक आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 124 खासगी व दोन सार्वजनिक असे खासगी 2173 आणि सार्वजनिक आठ अशा एकूण 2181 दिड दिवसांच्या गणरायांचे पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

रोहे ः रोहा तालुक्यात बुधवारी मोठ्या उत्साही वातावरणात गणरायाचे आगमन झाले होते. गुरुवारी (दि. 1) दुपारपासूनच दिड दिवसांच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद देत भावपूर्ण जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. गणेशभक्त डोक्यावर, हातगाडी, रिक्षा, चारचाकी वाहनांतून कुंडलिका नदीच्या पात्रात गणपती विसर्जनासाठी आणत होते. शहरात बंदर पकटी, नदी संवर्धन, दमखाडी व अष्टमी येथे विसर्जन करण्यात आले. रोहा पोलीस स्टेशन हद्दीत दिड दिवसाचे 698 तर कोलाड पोलीस ठाणे अंतर्गत 791 दीड दिवसाचे गणपती बसविण्यात आले होते. शहरात मुख्याधिकारी धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटावर नगर परिषद कर्मचारी, पोलीस तैनात होते. नगर परिषद व रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य गोळा करण्यात आले.

माणगाव ः गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात माणगावात दीड दिवसाच्या गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. या वेळी माणगाव नगरपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले. नगरपंचायतीतर्फे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply