Breaking News

पाली-खोपोली मार्गावरील पूल रखडले

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभूळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे आश्वासन एमएसआरडीसी व तत्कालीन शासनाने दिले होते, मात्र आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे पाली अंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेले. त्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, जनतेचा हा त्रास कधी थांबणार? असा सवाल संतप्त जनतेतून विचारला जात आहे. सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक जुन्या व धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. या वेळी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुलांना अधिक मजबूत व क्षमतेचे करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर पाली, भालगुल व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील नवीन पुलांचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी जुन्या धोकादायक पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. पूल कधी पूर्ण होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. याबरोबर पावसाळ्यात पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक देखील खोळंबते. यामुळे प्रवासी, चाकरमानी व वाहन चालकांची खूप गैरसोय होत आहे. पाली-खोपोली मार्ग सुस्थितीत यावा, येथील पूल नव्याने बांधण्यात यावेत यासाठी वारंवार आंदोलने केली गेली, पण प्रशासनाकडून कोणतीही जलद कार्यवाही नाही. या ठिकाणी तब्बल 25 कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. या तिन्ही ठिकाणचे एका बाजूचे पूल जून महिन्यात पूर्ण होऊन तेथून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते, मात्र कामगार उपलब्ध नसणे, ठेकेदाराचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे पुलांचे काम मागील अनेक महिन्यांपासून जैसे थे आहे. पाली, जांभूळपाडा व भालगुल येथील पुलांची केवळ 19 टन वजन भार पेलण्याची क्षमता आहे, मात्र या पुलांवरून 60 टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकुवत व धोकादायक होत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पावसाळ्यात येथील पाली अंबा नदी पुलावरून पाणी गेले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली, तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबरोबरच क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे हे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. नवीन पुलामुळे येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे, मात्र हे काम रेंगाळले असल्याने नागरिक व प्रवासी संतप्त झाले आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो, तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते, मात्र या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याआधीच या पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) तुटले आहेत आणि आता पुलावरून पाणी गेल्यामुळे इतरही रेलिंग वाहून गेले आहेत. त्यांना आधार देणारे सिमेंटचे काही ठोकळे देखील निसटले आहेत. कमकुवत लोखंडी कठडे, मोठाले खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येऊन साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत आहेत. पादचार्‍यांना देखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते. वाकण -पाली- खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबईवरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळेमार्गे पुणे आणि माणगावला ही जाता येते. त्यामुळे मुंबई, पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तिन्ही पूल लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. हे तिन्ही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलांवरून पाणी गेल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे वेळीच नवीन पुलाची निर्मिती होणे गरजेचे होते. हे नवीन होणारे पूल दर्जेदार व लवकर पूर्ण झाले पाहिजेत.

वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. संरक्षक कठड्यांअभावी येथे अपघाताची शक्यता आहे. येथील नवीन पुलाचे काम वेळीच होणे गरजेचे होते, मात्र त्यामुळे आता वाहन चालक, प्रवासी व पादाचार्‍यांना जीव मोठे घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रचंड गैरसोय होते. नवा पूल होईपर्यंत किमान या जुन्या पुलाची दुरूस्ती करण्यात यावी.
-कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

असे आहेत नवीन पूल
-पाली अंबा नदीवरील नवीन पुलाची उंची 16 मीटर असणार आहे, तर लांबी 110 मीटर आहे.
-जांभूळपाडा पुलाची उंची 16 मीटर, लांबी 70 मीटर इतकी आहे.
-भालगुल पुलाची उंचीदेखील 16 मीटर तर लांबी 55 मीटर असणार आहे. हे तिन्ही पूल
चार लेनचे होणार आहेत.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply