Breaking News

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

पनवेल : बातमीदार

परदेशात नोकरीला लावतो, असे सांगून एका 23 वर्षीय तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपीविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवराज घोटने (23) याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, तो नोकरीच्या शोधात होता. नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख ऑक्टोबर 2017मध्ये कोल्हापूरच्या शिव कन्सलटन्सी संचालक प्रमोद सोलापुरे नावाच्या व्यक्तीसोबत झाली. त्यांनी घोटनेला दुबई येथे ऑइल कंपनीमध्ये नोकरीस लावतो. त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यानुसार घोटनेने 50 हजार रुपये त्यांना कोल्हापूर येथील त्यांच्या ऑफिसमध्ये दिले. त्यानंतर मार्च 2018मध्ये प्रमोद सोलापुरे हे त्याला खारघर या ठिकाणी घेऊन आले व तेथे त्यांनी बी. के. सिंग नावाच्या व्यक्तीशी ओळख करून देऊन पुढील नोकरीस लावण्याचे व व्हिसाचे काम हे सिंग करतील, असे सांगितले. सोलापुरे यांच्या सांगण्यावरून घोटनेने सिंग यांना दीड लाख रुपये दिले. त्यानंतर घोटनेची ऑगस्ट 2018मध्ये बेलापूर (नवी मुंबई) येथे दोन वेळा व वांद्रे येथे एक वेळा वैद्यकीय तपासणी सोलापुरे व सिंग यांच्या सांगण्यावरून केली. त्याने या दोघांना फोन करून दुबई येथे नोकरीबाबत वारंवार विचारले असता ते चालढकल करीत होते. नोकरीला उशीर होत असल्याने घोटनेने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे घोटनेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद सोलापुरे, बी. के. सिंग व सुनील गौतम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply