Breaking News

वाचन म्हणजे स्वतःचा शोध

-शशिकांत सावंत (ज्येष्ठ पत्रकार)

तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान आहे, किती अस्सल आहे यावर वाचनाचा आनंद अवलंबून असतो. तुमचे संस्कार जागृत होऊन नव्याने अविष्कृत होत असतील तर हे वाचन चिरस्मरणीय असेच होत असते. वाचन म्हणजे जणू स्वतःचा शोधच असतो आणि आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे. सुदैवी माणसाला त्यामुळे, आज ना उद्या वाचनाकडे वळावे लागते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वाचन माणसाला समृद्ध करते. दिलासा देते-कदाचित जगणे सुसह्य करते. नामवंत साहित्यिकांकडून या उत्तम साहित्यकृतींची या सदरातून आपल्याला ओळख करून देत आहोत.

हेमिंग्वे

लेखक, कवी, चित्रकार यांची एक विशिष्ट प्रतिमा समाज माणसात असते. पाडगावकरांची  प्रतिमा, दाढी, पांढरा झब्बा-लेंगा हे अनेक व्यंगचित्रातून पुढे आलं आणि लोकप्रिय झालं. इतकं की कवी असाच असतो असं वाटायला लागलं. लेखकाची पॉप्युलर प्रतिमा कोणती ती नेमकी शब्दात सांगता येणार नाही, पण बर्‍याच अंशी अर्नेस्ट हेमिंग्वे ती पूर्ण करतो. दणकट शरीरयष्टी, बेधुंद वागणं आणि जगणं, तुफान मद्यपान, सैन्यात नोकरी, गोळ्यांचे 100 तुकडे खाऊन सैन्यातून परत आलेली व्यक्ती आणि बुलफाइटपासून सगळ्या रासवट खेळात सहभाग या भांडवलावर हेमिंग्वेची प्रतिमा इतकी उंचावली आहे आणि सगळ्यात कहर म्हणजे ज्याला इंग्रजीत म्हणतात, डेथ इज अ गुड करियर मुव्ह त्याप्रमाणे बंदुकीची गोळी तोंडात ठेवून केलेली आत्महत्या.

अशा हेमिंग्वेच्या अफाट कादंबर्‍या आहेत. ओल्ड मॅन अँड सी सारखी छोटेखानी कादंबरी प्रचंड ताकदीची आहे. तेवढीच ताकदीची फॉर हूम द बेल टोल्लस. पण मला त्याचं एक पुस्तक आवडतं. जे जवळपास एका बैठकीत वाचून होतं आणि पुन:पुन्हा ते मी वाचतो. ते म्हणजे मुव्हेबल फिस्ट. पॅरिसमधल्या त्याच्या वास्तव्याचं पुस्तक आहे. त्याने असं म्हटलं की, पॅरिस ही एक रंगीन आणि निरंतर चालणारी पार्टी आहे. त्यालाच त्याने मुव्हेबल फिस्ट असं म्हटलेलं आहे. हेमिंग्वे पहिल्या पत्नीबरोबर पॅरिसमध्ये राहत होता. त्या सुमारास तिथे पिकासो, जेम्स जॉयसी राहत होते. टीएस एलियट येऊन-जाऊन होता. इझरा पौंडसारखा महान संपादक तिथे होता. तसेच मॅक्सवेल परकीन्ससारखा माणूस पॅरिसमध्ये नसला तरी पॅरिसच्या अनेक लेखकांची मौल्यवान पुस्तकं संपादित करत होता.

या सगळ्यांना मोठा आधार दिला तो गट्रूड स्टाइनने. 1901 ते 1904 मध्ये अत्यंत गरिबीत दिवस कंठणार्‍या आणि ब्ल्यु पिआयने विकत पिरीएडमधली चित्रं रंगवणार्‍या पिकासोची काही चित्रं तिने विकत घेतली. पॅरिसमधल्या इतर विक्रेत्यांशी त्याची ओळख करून दिली. त्यामुळे त्याचा रोझ पिरिएड सुरू झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. ही सगळी मंडळी एकमेकांच्या इतकी जवळ होती की, 1920 साली झालेल्या पराद ओपेरामध्ये पिकासोने पडदे रंगवलेले होते.  डीघलेवने नृत्यदिग्दर्शन केलेलं होतं. समस्त पॅरिस तिथे हजार होतं अर्थात हेमिंग्वेसुद्धा.

हेमिंग्वेचा हा काळ तसा गरिबीचाचं होता. अनेक गोष्टी त्याने अतिशयोक्तीने रंगवल्या आहेत. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे चक्क वाइन घालून तो पाणी पित असे. शेक्सपियर आणि कंपनी या दुकानमधून  पुस्तकं वाचनालयातून मोफत वाचण्यासाठी नेतात तशी नेत असे. कारण त्याच्याकडे पैसेच नसतं. पहिल्या भेटीत त्याने शेक्सपियर आणि कंपनीच्या मालकिणीला विचारलं, तुमच्याकडे हेनरी जेम्स आहे का? हे म्हणजे एखाद्या मॉलमध्ये जाऊन तिथे चप्पला मिळतात असं विचारण्यासारखं होतं.

अर्थातच त्या काळात त्याला साथ दिली ती त्याच्या मित्रांनी. स्कॉट फित्झगेराल्डची एक कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्यानेचं मॅक्सवेल परकीन्सशी हेमिंग्वेची ओळख करून दिली. त्याने 1927 साली आपली पहिली कादंबरी लिहिली. सन ऑल्सो रायजेस उर्फ फिएस्टा. ही कादंबरी प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक आहे. त्यातली अनेक पात्रं आज ओळखता येतात. पॅरिसमधलं त्याचं वास्तव्य आणि इतर ठिकाणची भटकंती. तेव्हाचे सुशिक्षित किंवा अर्ध-शिक्षित लेखक यांची व्यक्तीचित्रे यात येतात, प्रवास येतो, खाणं-पिणं येतं. खरंतर ही साधी कादंबरी आहे. पण तरीही ती गाजली याचं कारण असं की, कादंबरीच्या सुरूवातीला एक वाक्य त्याने लिहिलं होतं ते म्हणजे अवर्स इज अ लॉस्ट जनरेशन. हे वाक्य गट्रूड स्टाइनने त्याला सुचवलं खरं. पण गट्रूडस्टाइनला हे वाक्य मिळालं ते एका लॉन्ड्रीवाल्याकडून. तो म्हणाला, तुमचं काय तुमची जनरेशनच लॉस्ट आहे. पहिल्या महायुद्धामुळे भंगुरपणे जगणार्‍या आणि त्या मन:स्थिती असणार्‍या अनेक तरुणांचं चित्रण त्याने अनेक कथांमधून केलं. ज्याच्यात निक अ‍ॅडम्स हा त्याचा मानसपुत्र. हे दुसरं तिसरं काही नसून हेमिंग्वेचा अवतार आहे.

निक अ‍ॅडम्स या पात्राच्या अनेक कथा त्याने लिहिल्या. त्यातील एका कथेचं वर्णन आहे की, तो मासे पकडायला जातो आणि अत्यंत तुच्छतेने नदीकडे पाहत काही वस्तू त्यात फेकून देतो. पण खरं असं असतं की, निक अ‍ॅडम्स युद्धावरून आलेला असतो आणि अनेकांचे, जवळच्या मित्रांचे मृत्यू त्याने पाहिलेले असतात. ही खरी हिमनग शैली म्हणजे थोडसं सांगायचं आणि बरचस वाचकाला समजू द्यायचं. हेमिंग्वे आपल्याला निक अ‍ॅडम्सबद्दल काहीच सांगत नाही पण त्याच्या वैतागलेल्या तिरस्कृत वागण्यातून आपल्याला त्याचा भूतकाळ कळतो. हे सगळं पॅरिसमध्येच हेमिंग्वेल का गवसलं. कारण जेम्स जॉयसीची कादंबरी इजरा पौंड संपादित करत होता. त्याच वेळेस तो टीएस एलियटची दीर्घ कविताही संपादित करत होता. जिचा एक तृतीयांश भाग त्याने कापून टाकला असं म्हणतात. एलियट तेव्हा बँकेत नोकरी करत असे. ही गरीब मंडळी मनाने इतकी उधार होती की, ते एकमेकांना नेहमी सांगत, एक खूप चांगला कवी आहे पण बिचार्याला बँकेत नोकरी करावी लागते. आपण त्याची नोकरी सोडवली पाहिजे. त्याला पैसे दिले पाहिजेत. तर असा पॅरिसमधला रंगीत काळ आपल्यासमोर उभा राहतो आणि एखाद्या चित्रपटाप्रमाणे तो समोर येतो. अशावेळी पहिल्या वागण्यात वाटत होतं की यावर चित्रपट का बनवला नाही. पण याच्या मिड नाइट इन पॅरिस या चित्रपटात हे सगळं आलेलं आहे पण हेमिंग्वेला श्रेय न देता आपल्याला पुनर्प्रत्ययाचा आनंदही घेता येतो.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply