आपत्कालीन यंत्रणा कर्मचारी, पोलिसांसह प्रवासी जखमी
खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर रविवारी (दि. 4) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले. किमी 28 जवळ खाजगी प्रवासी बस उलटून पहिला अपघात घडला. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जखमी झाल, तर दुसरा अपघात किमी 27/800 येथे घडला. त्यात रात्री गस्त घालणार्या आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी व पोलीस असे एकूण सहाजण जखमी झाले. टायर निकामी होऊन खासगी प्रवासी बस अनियंत्रित झाली व रस्त्यालगत उलटली. या अपघातात बसमधील अश्विनी पवार (वय 34), नैतिक पवार (वय 6, रा. मुंबई), संजय माने (वय 39, रा. नेरुळ), अरुण हाके (वय 32, मानखुर्द), नंदा नलवडे (वय 21, रा. दहिसर) आणि ज्योती कांबळे (वय 34, रा. भाईंदर) हे सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान द्रुतगती मार्गाच्या किमी 27/800 पुणे लेनवर दुसरा अपघात झाला. पुणे बाजूकडे जात असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फोर्ड इको स्पोर्ट कार (डीएल-12,सीएल-4488)चे टायर निकामी झाल्याने ती शोल्डर लेनवर थांबली होती. त्यांच्या मदतीकरिता आयआरबी डेल्टा फोर्स पेट्रोलिंग स्टाफ, खालापूर पोलीस ठाण्याच्या दरोडा प्रतिबंधक पथकामधील पोलीस व होमगार्ड यांच्यासह अन्य कर्मचारी आयआरबी डेल्टा फोर्स पेट्रोलिंग जीप (एमएच-14,एएच-7467) मधून आले. ते रिफ्लेक्टर कोन लावून, शोल्डर लेनवर थांबून अपघातग्रस्तांना मदत करत होते. याचवेळी पाठीमागून आलेला अज्ञात वाहनाने थांबलेल्या इको स्पोर्ट कार व डेल्टा फोर्स जीप तसेच शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या पोलीस जीपला धडक दिली. या अपघातात आयआरबी कंपनी डेल्टा फोर्सचे लक्ष्मण आखाडे (वय 30), पोलीस शिपाई एस. बी. चौहाण, होमगार्ड दिपेश हातनोलकर (वय 26), डेल्टा फोर्स जीप चालक गुलाब नलावडे (वय 37) यांच्यासह बंद पडलेल्या कारमधील जोसेफ मस्करेनहस (वय 26, रा. अंधेरी मुंबई) व अन्य एक असे सहाजण गंभीर जखमी झाले. त्यांनाही कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.