Breaking News

मुरूडमध्ये विधवा महिलांना मिळणार सन्मानाची वागणूक

कुणबी समाजाचा पुढाकार; एकमताने ठराव मंजूर

मुरूड ः प्रतिनिधी

कुणबी समाजोन्नती संघ मुरूड जंजिरा विभागातील नांदले, चिंचघर, उसडी-चाफेगाव, जमृतखार, सावली, मिठागर या गावांतील समाज बांधवांची सालाबादप्रमाणे गौरी गणपती सण व 75व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त सभा नुकतीच झाली. विधवा प्रथा बंद करून अशा महिलांना सनान्माची वागणूक देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत समाजातील ज्येष्ठ व्यक्ती व समाज बांधवांनी या विषयावर आपले मत मांडून क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत केले व समाजाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पतीच्या निधनावेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे किंवा विधवा म्हणून हिणवणे तसेच धार्मिक कार्यक्रमात प्रवेश नाकारणे यांसारख्या अनिष्ट प्रथामुळे स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादली जात असतात. या अमानवी प्रथा, परंपरा बंद करून स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून अधिकार मिळावेत असा असा ठराव सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या सभेला ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष मंगेश पाटील, ग्रामीण सचिव सचिन पाटील तसेच मुंबई व ग्रामीण कार्यकारिणी, कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.

आपला देश विज्ञानवादी म्हणून वाटचाल करीत आहे. ते पाहता विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. यामुळे हा निर्णय कौतुकास्पद असून समाजातील सर्वस्तरांवर त्याची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply