उरण : वार्ताहर
उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे.
दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब हवामान, अतिवृष्टी, वादळांमुळे काही दिवस मासेमारी बंद ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर येऊन ठेपली होती. त्यानंतर लागलीच मच्छीमारांवर नव्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जेली फिशचे संकट उभे ठाकल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी किनार्यावर उभ्या केल्या आहेत.
मासेमारी सुरू होऊन महिनाच उलटला असतानाच उरणच्या मच्छीमारांवर जेलीफिशचे संकट उभे ठाकले आहे. यामुळे मासेमारीला मुकावे लागत आहे. याशिवाय वेळ, पैसा, मेहनत वाया जात असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
वातावरणातील बदलामुळे जेलीफिश खाद्याच्या शोधात किनार्यालगत येतात आणि मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतात. जेलीफिश आणि मासळी विलग करणे मोठे जिकिरीचे काम असते. विषारी जेलीफिशचा स्पर्श अथवा डंख अत्यंत वेदनादायक असतो. त्यामुळे मच्छीमारांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
-सुरेश भारती, उपायुक्त, रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग