Breaking News

आरटीई निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुदतवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. ही मागणी मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे व दाखल्यांची पूर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. शासकीय संप व इतर साप्ताहिक सुट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे राज्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसर्‍या शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे दुसर्‍या शाळेत प्रवेश मिळणे कठीण होणार असल्याने आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मुदतीची निर्माण होणारी अडचण दूर करावी, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पूर्तता करण्यात होणार्‍या अडचणी दुर करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेयमंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून त्या संदर्भात शासनाकडून परिपत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) 5 एप्रिल रोजी काढण्यात आली होती. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशाची मुदत दिनांक 13 एप्रिल ते 8 मे होती. नंतर ही मुदतवाढ 15 मेपर्यंत देण्यात आली, परंतु मात्र कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरिता दिनांक 22 मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून पाल्य व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच शालेय शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply