- नगर परिषदेकडून अॅप विकसित
- कर संकलनासह पर्यटनाला चालना
कर्जत : बातमीदार
माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. तसे होऊ नये आणि पर्यटकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे यासाठी माहिती देणारे अॅप माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून विकसित करण्यात आले आहे.
आता माथेरानमध्ये प्रवास करताना पर्यटकांनी प्रवासी स्वच्छता कर भरल्यानंतर डिजिटल पावती दिली जाईल आणि त्या पावतीवर असलेला क्यूआर कोड मोबाइलवरून स्कॅन केल्यास माथेरानची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी पहिली डिजिटल पावती घेत पालिकेच्या प्रवासी कर संकलन मोहिमेचा शुभारंभ केला. या डिजिटल प्रणालीमुळे महसूल आकारणीत पारदर्शकता येणार असून पर्यटकांना विविध प्रकारची माहितीही उपलब्ध होणार आहे.