नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थसंकल्पापूर्वी होणारा हलवा बनवण्याचा सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानंतर बजेटचे वेध लागले आहेत. यंदाच्या बजेटचे सादरीकरण दरवर्षीपेक्षा वेगळे असणार आहे. नववर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करणारा नोकरदारवर्ग, अभ्यास व परीक्षा घरून देणार्या विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक, शेतकरी या सार्यांनाच बजेटकडून अपेक्षा आहेत. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच बजेट जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सर्वच क्षेत्रांतील कर्मचार्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे यंदाच्या बजेटमध्ये एक मोठा बदल होणार आहे. यंदा देशाचे बजेट लाल रंगाच्या कपड्यात नव्हे, तर ऑनलाइन पद्धतीने सादर होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने हे बजेट सर्वांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी डिजिटलायजेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व सदस्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे ऑनलाइन पद्धतीनेच दिली जातील, असे सूत्रांनी सांगितले.
-युनियन बजेट मोबाइल अॅप
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युनियन बजेट अॅप लाँच केले आहे, ज्यामध्ये बजेटसंदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळेल. या अॅपद्वारे स्मार्टफोनधारक हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहचविणे हाच यामागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अॅपच्या माध्यमातून बजेट उपलब्ध होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या अॅपला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल. सर्व कागदपत्रे डाऊनलोडदेखील करता येणार आहेत.