महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा गौरा गणेशोत्सव
पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना लालबागचा राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी (दि. 13) विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 30वे वर्ष आहे.
पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 29 वर्षांपासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या संघटनेचे जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सभासद असून छोटे मोठे व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणार्यांचा सहभाग मोठ्या संख्येने आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव भक्तीमय वातावरणात व शांततामय साजरा केला जातो.
गौरा गणेशोत्सव साजरा करण्यामागची संकल्पना सांगताना संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यात गणेशोत्सव साजरा होत असताना भाविकांना गणरायासाठी आवश्यक असणारे साहित्य विक्री करण्यात येथील व्यावसायिक गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी संघटनेने गौरा गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
गौरा गणेशोत्सवाच्या प्रारंभी वेगवेगळ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात होती, परंतु गेल्या 23 वर्षांपासून लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्येच तयार करून प्रतिष्ठापना केली जात आहे. लालबागचा राजाची मूर्ती साकारणारे संतोष कांबळी व त्यांचे सहकारी गेल्या 15 ते 20 दिवसापांसून पनवेलमध्ये गणेशमूर्ती साकारण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत, तर बाप्पाचे धोतर सजवण्याचे काम रूपेश पवार करीत आहेत.
या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबई, रायगडसह मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांतून पाच लाखांपेक्षा जास्त भाविक आवर्जून येतात. लालबागचा राजाचे दर्शन झाले नाही असे भाविक तसेच पूर्ण झालेल्या मनोकामनेचे नवस फेडण्यासाठी भाविक पनवेलकडे धाव घेतात. हा गौरा गणेशोत्सव साजरा करीत असताना सर्व धर्मिय भाविक जात, पात, वंश, भाषा असे सर्व भेद विसरून एकदिलाने कार्यरत असतात. गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, ज्याचा लाभ जवळपास साठ हजारांपेक्षा जास्त गणेशभक्त घेतात, असेही नाईक यांनी सांगितले.