Breaking News

रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उरण तालुक्यातील चिर्ले तसेच पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण होणार

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील चिर्ले तसेच पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्या माध्यमातून या भागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 14) येथे व्यक्त केला.
शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जाऊन कामाचा आढावा घेतला. या वेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा 22 किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे.
या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषणविरहित असा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंचीदेखील काळजी घेण्यात आली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांत पार करणे शक्य होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा  प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वेला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई-वरळी कोस्टल रोडदेखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply