Breaking News

खारघरमध्ये ’जीएसटी परिसर’ निवासी संकुलाचे ना. सीतारामन यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : प्रतिनिधी
कर रूपातील महसूल गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा. त्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (दि. 14) खारघर येथे केले. केंद्र शासनाने जीएसटी कर्मचार्‍यांसाठी खारघरमध्ये नव्याने बांधलेल्या ’जीएसटी परिसर’ या निवासी संकुलाचे लोकार्पण ना. सीतारामन यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी जीएसटी कर्मचार्‍यांच्या महसुली संकलनात दरमहा वाढ करण्याच्या कामगिरीचे खास कौतुक केले.
या समारंभास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, जीएसटी विभागाचे अशोककुमार मेहता, विवेक चौधरी, पी. के. गुप्ता, संगीता शर्मा, सचिव तरुण बजाज व इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसूल गळती कुठे होत आहे हे शोधण्यासाठी तंत्रज्ञान वापर करण्यास सांगून त्यासाठी प्रशिक्षणाशी संबंधित विषयावर महसूल सचिव आणि सीबीआयसीचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगितले.
लवकरच अधिकार्‍यांना देशाच्या विविध भागांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांना महसूल गळती बंद करण्यात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सोयीस्कर वाटेल. या प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा डीपडाईव्ह, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) यांचा अधिक चांगला वापर करण्यावर भर दिला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत अर्थव्यवस्था कशी सुस्थितीत आहे याचा आणि जीएसटी संकलनातील वाढलेल्या आकड्यांबद्दलही उल्लेख केला होता, असे ना. सीताराम यांनी नमूद केले.
ना. सीतारामन यांच्या हस्ते काही कर्मचार्‍यांना प्रातिनिधिक सदनिकांच्या वाटप करण्यात आले. या वेळी देण्यात येणार्‍या चावीच्या प्रतिकृतीवर अर्थमंत्र्यांचे छायाचित्र होते. त्यांनी कर्मचार्‍यांना चावी देताना प्लेन बाजू पुढे केली व यापुढे माझे छायाचित्र न लावता ज्या कर्मचार्‍याला सदनिका दिली जाईल त्याचे छायाचित्र त्यावर लावल्यास तो क्षण अविस्मरणीय होईल, असे म्हटले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी जीएसटी कर्मचार्‍यांसाठी अशा प्रकारचे प्रोजेक्ट देशात उपलब्ध करून दिल्यास महसूल वाढून देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, असे म्हटले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply