Breaking News

टोलवाढीवर तोडगा निघेल : आमदार प्रशांत ठाकूर

वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही

कळंबोली : प्रतिनिधी

दळणवळण हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाहतूक यंत्रणा बंद राहिली, तर देशातील सर्व व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. ते लक्षात घेता यावर सरकारी पातळीवर नक्कीच तोगडा निघेल. वाहतूकदारांना टोलवाढीसंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन,  अशी ग्वाही सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 16) येथे दिली. ते कळंबोलीत आयोजित वाहतूकदारांच्या बैठकीत बोलत होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलवसुली करण्यासाठी नव्या कंपनीची निवड करण्यात येणार आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात ग्लोबल सहकार कंपनीला टोलवसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे, मात्र या कंपनीने अवजड वाहनांना भरमसाठ टोल वाढविल्याने याविरोधात सोमवारी कळंबोली येथील काळभैरव मंदिरात वाहतूक संघटनांनी बैठक बोलावली होती.

या बैठकीत बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, देशाच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण भिस्त वाहतूक यंत्रणेवर अवलंबून आहे. वाहतुकीशिवाय  देशाचा गाडा

हाकता येऊ शकत नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ग्लोबल सहकार कंपनीमार्फत जी भरमसाठ टोलवाढ करण्यात आली ती अन्यायकारक आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सरकारी पातळीवर मार्ग काढण्यात येईल. तेव्हा आपण जनतेला त्रास होईल असे कोणतेही आंदोलन करू नका. वाहतूक चालू ठेवा. तोडगा नक्की निघेल.

या वेळी शिवसेनेचे रामदास शेवाळे यांनी सांगितले की, ग्लोबल सहकार कंपनीने अन्यायकारक टोलवाढ केली आहे.

आयआरबी अवजड वाहनांवर 1060 रुपये टोल आकारत होती. आता ग्लोबल सहकार कंपनीने 2616 रुपये एवढी भरमसाठ वाढ केली आहे. या जाचक टोलवाढीमुळे वाहतूकदारांना गाड्या बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा यावर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंती त्यांनी आमदार प्रशांंत ठाकूर यांना केली. 

या बैठकीला भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, बबन बारगजे, कामगार नेते राजूशेठ बनकर, ज्येष्ठ नेते बुधाजी ठाकूर, संदीप भगत, नितीन काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वाहतूक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply