संबंधित अधिकार्यांवर हक्कभंगाचा ठराव आणणार
पेण : प्रतिनिधी
पेण नगर परिषदेतील मुख्याधिकारी व गटनेते यांच्यातील वादात राजकीय हस्तक्षेप होत असून यामागे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील एकवटले आहेत. त्यांनी राजकीय सुडातून झालेल्या कारवाईचा बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषद घेऊन निषेध केला. या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यावर सभागृहात हक्कभंगाचा ठराव आणणार असल्याचे या वेळी आमदार प्रशांत यांनी सांगितले.
पेणमधील वैकुंठ निवास येथे झालेल्या पत्रकार परिषदेस भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पेणचे आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, दर्शन बाफना, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविकांत म्हात्रे, उपाध्यक्ष कुणाल पाटील व नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, मी व महेश बालदी यांनी गेली 20 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामकाज केलेले आहे. मुख्याधिकारी हे लोकप्रतिनिधी व शासन यांच्यात समन्वय साधणारा दुवा असतो, मात्र 16 ऑक्टोबर रोजी पेण पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर जे घडले ते महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेले आहे. सभागृहात एखाद्या नगरसेवकाने लोकांच्या समस्येबाबत जाब विचारणे हे जर सरकारी कामकाजात अडथळा आणणे असे म्हटले जात असेल तर यापुढे अशा सभेत कामकाज चालेल की नाही याबाबत शंका आहे.
मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांनी खासदार सुनील तटकरेंच्या राजकीय दबावाखाली सूडबुद्धीने हे प्रकरण घडविले असल्याचा आरोप उपस्थित आमदारांनी या वेळी केला. या प्रकरणामागे खासदार तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे असल्याचे सांगून प्रशासनाला स्वतःच्या दावणीला बांधून विरोधकांवर खोट्या केसेस दाखल करणे हे त्यांचे काम आहे, असाही आरोप केला, मात्र भारतीय जनता पक्ष आता गप्प बसणार नाही. या प्रकरणाशी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व पेण पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर सभागृहात हक्कभंगाचा ठराव आणणार असल्याचे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पुढच्या राजकारणाचे परिणाम विरोधकांना भोगावे लागतील असे सांगून राष्ट्रवादीविरोधात भारतीय जनता पक्ष कणखर भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.