Breaking News

अज्ञानी पर्यटक आणि उपेक्षित ठिकाणे

’केल्याने देशाटन’ हा एक कार्यक्रम आमच्या लहानपणी दुरदर्शनवर लागत असे. या कार्यक्रमात उपेक्षित असलेली पर्यटन स्थळे प्रकाशात आणली जात असत. पर्यटकांना काय वेगळ पहायला मिळेल आणि शिकायला मिळेल याचा चांगला उद्देश यातून साध्य व्हायचा, मात्र आजच्या चॅनलमधील स्पर्धा आणि मालिकांची लोकप्रियता पाहता असे कार्यक्रम मागे पडू लागले आहेत. त्यामुळे नवनवीन पर्यटन स्थळे लोकांना माहित होत नाहीत. पर्यटन हे जसा रोजगारनिर्मित करून देणारे क्षेत्र असले तरी पर्यटन स्थळांच्या लोकप्रियतेमुळे त्या गावचा अथवा शहराचा विकास होतोच त्याचबरोबर तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ, बोलीभाषा याचादेखील प्रसार आणि प्रचार होतो. पर्यटन म्हटल की थंड हवेच ठिकाण, समुद्र किनारा नाहीतर एखाद प्रसिद्ध देवस्थान हेच आमच्या डोळ्यासमोर येत, मात्र खरच पर्यटन म्हणजे हे एवढच असत का? की आम्हा पर्यटकांना खर्‍या पर्यटनाची जाणिवच नाही का? की ती आम्हाला करू दिली जात नाही का? आजची परिस्थिती ही अशी आहे की भारतातला 90 टक्के पर्यटक हा देव देवस्थान यांच्या मागे फिरत असतो. उरलेला समुद्र किनारी अथवा थंड हवेच्या किंवा बर्फाळ ठिकाणी जात असतो. भारतात या तिनही गोष्टींची कमी नाही. गुजरातपासुन ते पश्चिम बंगालपर्यंत पसरलेला समुद्रकिनारा आहे. महाबळेश्वर, उटी महीसुर सह काश्मीर, उत्तराखंड येथे हजारो थंड हवेची ठिकाणे आहेत तर सोमनाथ पासुन पूरीपर्यंत ते अमरनाथपासून रामेश्वरपर्यंत लाखो तिर्थक्षेत्र आहेत की जिथे हा पर्यटक मोठ्या संख्येने जात असतो, मात्र आजही अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत की जी उपेक्षित आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहीत करण्याच काम कोणीही करीत नाही. काही पर्यटन कंपन्या पर्यटकांचे समाधान हे उद्दिष्ट न ठेवता एखाद आढ दहा दिवसांच पॅकेज घ्या देतात. त्यामुळे तुमच वैयक्तिक स्वातंत्र्य अस काही रहातच नाही. ना की पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. वाहनचालकांपासुन हॉटेल व्यवसायीकांपर्यत यांचे लागे बांधे असतात, मात्र यातही इंटरनेटवर एक चांगला पर्याय यासाठी उपलब्ध आहे. मात्र एवढी मेहणत घेतो कोण? मला आठवते आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेची सहल जायची. तो ही पर्यटनांचाच एक भाग असे. यात एखाद्या ऐतिहासिक किंवा औद्योगिक कारखान्याला भेट दिली जायची किंवा एखादे प्राणी संग्रहालय दाखवले जायचे. या प्राणी संग्रहालयात प्राण्यांची माहिती आणि लुप्त होणारे प्राणी प्रत्यक्ष पहायला मिळायचे. एखादा वाहन निर्मितीचा कारखाना वाहन कसे तयार करतो अथवा साखर कारखान्यात साखर कशी तयार होते हे दाखवले जायचे. तर ऐतिहासिक ठिकाणी जाऊन त्या काळातला इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोर आणला जायचा. यातुन आम्हा विद्यार्थ्यांना बरेच काही शिकायला मिळायचे, मात्र आता शाळा मुलांना नेतात कुठे तर वॉटर पार्क नाहीतर एखाद प्रसिद्ध मंदिर…यात विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळत माहित नाही, पण शिक्षकांचे मित्र चांगलेच देवदर्शन आणि मनोरंजन होते. देशाच सोडा नुसत्या महाराष्ट्रातच अशी काही पर्यटन ठिकाणे आहेत की तिथ गेल्यावर डोळ्याची पारण फीटतात. आयुष्यात काहीतरी बघितल, अनुभवल आणि नव ज्ञान आत्मसात केल्याच समाधान मिळत. अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे येथील पहिल्या आणि दुसर्‍या दशकातील लेणी, अभेद्य आणि तेवढाच रहस्यमय देवगिरी किल्ला, अमरनाथ, शिखर शिंगणापूरसारखी असख्या पुरातन आणि हेरीटेज मंदिर आहेत यांची कोरीव कला कुसर आणि निर्मितीचे तंत्रज्ञान पाहिलेत तर मन थक्क व्हायला होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या काळात स्वराज्याच्या शिलेदारांचा पराक्रम दाखविणारे गडकोट किल्ले हजारोच्या संख्येने या महाराष्ट्रात आहेत. नुसता रायगड किल्ला पाहिला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट बुद्धीमता आणि अतुलनीय शौर्याची जाणीव होते. ब्रिटीशकालीन अनेक इमारती आहेत की ज्या आजही त्याच दिमाखात आजही पुर्ण क्षमतेने आपली जबाबदारी पार पाडत आहेत, उदा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका इमारत, पोलीस मुख्यालय, मुंबई विद्यापीठात आणि गेटवे ऑफ इंडिया अशी अनेक नावे सांगता येतील. आधुनिक भारताची क्षमता दर्शविनारे भाभा अणुशक्ती केंद्र, किंवा तारा अणुऊर्जा प्रकल्प, तर मानवाच्या अचाट बुद्धी कौशल्याची प्रचती करून देणारा कोयनेचा जल विद्युत प्रकल्प हादेखील पर्यटनाचा महत्वाचा भाग आहे. चांदोली, कोयना, चिखलदरा सारखी अभयारण्य, तसेच जागतिक वारसा असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान असलेला सह्याद्री आणि यांतील दर्या खोरे, कोसळणारे धबधबे, जंगले हा देखील पर्यटनाचा उत्तम मार्ग आहे. 720 किमीचा समुद्र आणि यांतील समुद्र किनारे (बिचेस) पर्यटकांनी फुललेले असतातच, मात्र त्याचबरोबर गेली साडेतीनशे वर्षे स्वराज्याचे आणि महाराष्ट्राचे रक्षण करणारे व शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले समुद्र दुर्गदेखील याच किनार्यावर लाटांचे आणि वादळांचे तडाखे झेलत दिमाखात उभे आहेत. तर समतेचा क्रांतीचा संदेश देणार्‍या चवदारतळ्या सारखी अनेक ठिकाणे या महाराष्ट्रात आहेत की जेथुन संपुर्ण जगाने हा वारसा नेला आहे, पण आम्हा अज्ञानी पर्यटकांना ही स्थळे कधीच दिसत नाहीत. म्हणून आजच्या पर्यटनाकडे पाहता खुपच निराशाजनक चित्र समोर येते. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश सायख्या राज्यांनी त्यांच्या ऐतिहासिक धरोवर जतन करून त्या जगासमोर ज्या पध्दतीने आणल्या आहेत त्याच पध्दतीने महाराष्ट्रात ही याची गरज आहे…!

-महेश शिंदे, महाड

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply