Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणात पनवेल महापालिकेचा राज्यात पाचवा, तर देशात 17वा क्रमांक

पनवेल ः प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेत 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेने पाचवा, तर देश पातळीवर 382 शहरांमध्ये 17वा क्रमांक पटकाविला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ++ दर्जा प्राप्त झाला आहे. पनवेल महापालिकेने यंदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्या क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. तत्कालीन महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश प्रसारित करणारी चित्रे भिंतीवर काढण्यात आली तसेच तलावांची स्वच्छता करण्यात आली होती. विविध टाकाऊ वस्तूंचे रिड्युस, रियुझ, रिसायकलाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत चित्रकला, पोस्टर जिंगल, गाणी, व्हिडीओ, शॉर्टफिल्म, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छ सोसायटी, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा-महाविद्यालय, स्वच्छ प्रशासकीय कार्यालये स्पर्धा घेण्यात आल्या. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्वच्छताविषयक जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदविला. महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनविषयक विविध उपक्रम राबविले गेले. त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात आला. या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या विविध सभा, समारंभ थ्रीआर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. विविध सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरणाचे महत्त्व सांगून कंपोस्ट खत तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. पनवेल महापालिकेचे नगरसेवक-नगरसेविका, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते,  विभाग प्रमुख अनिल कोकरे यांच्याबरोबरच स्वच्छता निरीक्षक, कर्मचारीवृंदाने व स्वच्छतामित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पनवेल महापालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे. यापुढेही नागरिकांनी महापालिका क्षेत्र कचरामुक्त राहावे यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply