Breaking News

राज्यात उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवल्या; नियमावली जारी

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉल सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना मंगळवारी (दि. 19) जारी करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर करमणूक उद्यानेही (अम्युझमेंट पार्क) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. भाजपनेही हा मुद्दा उचलून धरत व्यापार्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळदेखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ही वेळ वाढवली जाणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्याच दिवसापासून करमणूक उद्याने खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, सर्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री 12 नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री 11पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply