महापालिकेतर्फे बचत गटांना उद्योजकता विकास प्रशिक्षण
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी पुढकार घेण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील बचत गटातील महिलांकरिता सशक्ती महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन 10 ते 13 ऑक्टोबर या दरम्यान आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आले होते.दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत दि लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्त विद्यामाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कसा करायचा, आर्थिक गुंतवणूक कशी करायची, व्यवसायाबद्दलच्या विविध योजना, डिजिटल व्यवसाय ऑनलाइन मार्केटिंग करणे, व्यवसाय करताना संवाद कौशल्यांचे महत्त्व तसेच कर्ज मिळविताना बिझनेस प्लॅन कसा तयार करावा अशा विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये एकूण 40 महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण हे उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे व्यवस्थापन लर्निंग लिक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांचे प्रशिक्षक कपिल गवळे, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय कक्षाच्या तांत्रिक तज्ज्ञ विनया म्हात्रे, नवनाथ थोरात व समुदाय संघटिका ललिता कचवे यांनी केले.
प्रशिक्षणाचा महिलांना मोठा उपयोग …
वाढत्या स्पर्धेच्या युगात या प्रशिक्षणामुळे आम्हाला आमचा व्यवसाय वाढविण्यासाठीच्या विविध संकल्पना समजल्या. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा आम्हाला मोठा उपयोग झाल्याच्या प्रतिक्रिया या वेळी महिलांनी दिल्या.