Breaking News

रोहा-पांगळोली येथे स्थानिक प्रशासनाकडून आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

रोहा तालुक्यातील पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभागाला गावातील जनावरे मृत झाल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्देशानुसार मंगळवारी (दि. 19) प्रांताधिकारी विट्ठल इनामदार, उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन डॉ. रत्नाकर काळे, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम, रोहा तहसीलदार कविता जाधव, तालुका पशूधन विकास अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. प्रथमदर्शी रविवारी (दि. 17) तीन जनावरांचे मृतदेह निदर्शनास आले, मात्र संध्याकाळची वेळ झालेली असल्याने व पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने शवविच्छेदन सोमवारी (दि. 18) करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल, असे तालुका पशूधन विकास अधिकारी डॉ.अक्षय सांगळे यांनी स्पष्ट केले होते. या वेळी उपस्थित ग्रामस्थांना पशूंच्या आरोग्याबाबत व सद्यस्थितीत गुरांच्या घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सध्या या गावात पशूसंवर्धन विभागाच्या व स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेने मागील दोन दिवसात एकही पशू दगावलेला नाही. तसेच ज्या पशूंवर उपचार करण्यात आले आहे, त्यांच्या आरोग्यात समाधानकारक सुधारणा झाल्याचेही आढळून आले आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply