Breaking News

महाडच्या खरवलीत मिरवणूक अंगलट

नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी.  
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्‍याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर  महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 17) जाहीर झाला. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीत बहुमत मिळवले, परंतु सरपंचपद गमावले. महाविकास आघाडीचे विजयी सरपंच आणि तीन उमेदवारांनी एमआयडीसी नडगाव ते काळीज या ठिकाणापर्यंत दुपारी ढोल ताशाच्या गजरात, घोषणा देत व फटाक्यांची आतषबाजी करत विनापरवाना मिरवणूक काढली. जिल्हाधिकार्‍यांचे मनाई आदेश असतानाही या आदेशाचे तसेच आचारसंहितांचे उल्लंघन करून सरपंच चैतन्य म्हामुणकर व इतर सदस्य व कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत आपला आनंद साजरा केला.
याचदरम्यान महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे यांना मिरवणुकीत धमकाविण्यात आले. त्यामुळे पोलीस शिपाई मढवी यांनी फिर्याद दाखल केली आली असून खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच चैतन्य म्हामुणकर, सदस्य रवींद्र नलावडे, रेखा सकपाळ व श्रुतीका म्हस्के, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय देशमुख, जगदिश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनल उत्तेकर तसेच नितीन सकपाळ, बाळा सपकाळ, अमोल मस्के यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply