Breaking News

नाममात्र बदल?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे. अर्थात त्यामुळे फारसे काही बदलणार नसून पक्षाची अवघी सूत्रे हायकमांडच्याच हाती राहतील हे सर्वज्ञात आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचा दावा त्या पक्षाकडून कायमच केला जात असला तरी गेली तब्बल 24 वर्षे काँग्रेस पक्षाध्यक्ष पद हे गांधी परिवाराकडेच राहिले आहे. त्यातीलही निव्वळ दोन वर्षे 2017 ते 2019 हा काळ वगळता पक्षातील हे सर्वोच्च पद सोनिया गांधी यांच्याच हातात राहिले आहे. 2014पासून काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणी होत गेली आहे. त्यामुळेच आता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षासंदर्भात काहीतरी वेगळे घडण्याची, किमान घडते आहे असे दाखवण्याची नितांत आवश्यकता होती. त्यातूनच अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा हा अवघा खेळ खेळला गेला असावा. या निवडणुकीत दुरंगी लढत झाली ती तरुण नेते शशी थरुर यांच्या निवडणूक लढवण्याबाबत ठाम राहण्यामुळे. अर्थात मल्लिकार्जुन खरगे हेच निवडून येणार हे सगळ्यांना आधीच ठाऊक होते. गांधी घराण्याचा कल खरगे यांच्या बाजूने होता तर शशी थरुर हे पक्षनेतृत्वाला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवणार्‍या ‘जी-23’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या काँग्रेसमधील असंतुष्टांच्या गटामधले एक आहेत. बुजुर्ग आणि अनुभवी राजकारणी असलेल्या खरगे यांचे पारडे जड असल्याचा सूर राजकीय पंडितांनी सुरुवातीपासूनच लावला होता. त्यामुळे खरगे यांना 7,897 आणि थरुर यांना अवघी 1,072 मते मिळाली तरी त्याविषयी फारसे कुणाला आश्चर्य वाटले नसेल. खरगे यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाचे आजवरचे पारंपरिक स्वरूपच कायम राहील असा टीकेचा सूर लागतो आहे. शशी थरुर हे तरुण, बुद्धिमान आणि संयुक्त राष्ट्रांतील प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. त्यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली असती तर पक्षाला नवा चेहरामोहरा मिळण्यास मदत झाली असती असे मतही काही राजकीय पंडितांनी व्यक्त केले आहे, परंतु 137 वर्षांचा इतिहास गाठिशी असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था आता इतकी दीनवाणी आहे की खरगे अध्यक्षपदी असोत वा थरुर, तेवढ्याने परिस्थितीत फारसा काही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला टक्कर देण्याचे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस पक्षात फार मोठे मूलभूत बदल घडून यावे लागतील. अध्यक्षपदी खरगे आले असले तरी परिवारवादाच्या सावलीतून हा पक्ष बाहेर पडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. गेल्या आठ वर्षांत पक्षाची संघटना इतकी मोडकळीस आली आहे की तिला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षसंघटनेत आणि एकंदर कार्यशैलीत आमूलाग्र बदल घडवावे लागतील. आता अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे तसेच राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे किमान काही तर घडत असल्याचे चित्र तरी निर्माण झाले आहे. इथून पुढे खरगे यांना पक्षाला नवसंजीवनी देण्याचे शिवधनुष्य पेलतानाच गांधी घराण्याची मर्जीही सांभाळावीच लागणार आहे. मोदींच्या आव्हानासमोर पक्षाला सक्षमपणे उभे करण्यासाठी निव्वळ विरोधाचे राजकारण सोडून पक्षाचा स्वत:चा असा काही विधायक कार्यक्रमही जनतेसमोर न्यावा लागणार आहे. नवे अध्यक्ष ही आव्हाने कशी पेलतात हे येणारा काळच दाखवून देईल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply