Breaking News

अलिबागमधील सागाव फिडरमध्ये बिघाड; पाच हजार ग्राहक अंधारात; 16 तासाने वीजपुरवठा सुरळीत

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) रात्री मुसळधार पावसासोबत वीजाही चमकत होत्या. अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवरील वाडगाव येथील इन्सुलेटरवर वीज पडून रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाच हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. सोळा तासानंतर बुधवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्‍यांना यश आले आहे.  अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवर साधारण पाच हजार ग्राहक महावितरणची सेवा घेत आहेत. मंगळवारी मुसळधार पावसामुळे या फिडरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना फटका बसला. महावितरण कर्मचारी भर पावसात मध्यरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. राऊतवाडी ते वाडगाव दरम्यान झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना मुसळधार पाऊस, अंधार आणि वाढलेले मोठे गवत यामुळे अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा बुधवार सकाळपासून पावसात महावितरण कर्मचार्‍यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. अखेर 16 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. वीज पडल्याने हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता एन. आर. बागडे यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील सागाव, नेहुली, वाडगाव, तळवली, कार्ले, गोंधळपाडा, खंडाळा या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला होता. त्यामुळे या गावांना कालची रात्र अंधारातच काढावी लागली. महावितरणचे अलिबाग येथील कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, सहाय्यक अभियंता इनामदार, एन. आर. बागडे यांच्यासह वीज कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply