पनवेल ः वार्ताहर
शहरापासून दूर आणि अपुर्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होईल, असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टपाल कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. कामोठेची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात गेली आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. सेक्टर 5 येथे मारुती सोसायटीत 500 चौरस फुटांच्या जागेत विभागीय टपाल कार्यालय आहे. या कार्यालयात कर्मचार्यांची संख्या अपुरी आहे. कार्यक्षेत्राचा विचार करता सध्याच्या कार्यालयाची जागा अपुरी आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून या टपाल कार्यालयाचे मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. दररोज सुमारे 1500 पत्र स्पीड व रजिस्टर्ड पोस्टाने आणि सरासरी चार हजार पत्र साध्या टपाल सेवेने पाठवली जातात. पार्सल व आधारकार्ड दुरूस्तीची सेवा, बचत खाते, आवर्ती ठेव आदी पोस्टाच्या योजनांच्या कामासाठी नागरिकांची गर्दी असते. अशातच कार्यालयातील उपपोस्ट मास्टर, दोन सहाय्यक आणि 12 पोस्टमन अशा 15 कर्मचार्यांच्या जोरावर सध्या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अपुर्या जागेमुळे या कर्मचार्यांना कार्यालयात अत्यंत दाटीवाटीने काम करावे लागत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.