भाजपचे महामंत्री विजय घाटे यांची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे. या प्रक्रियेनुसार सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवली आहे. सध्या हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी समाप्त होत आला आहे. शेवटचे दोन दिवस उरले आहेत, मात्र यात सुट्ट्यांचा कालावधी आल्याने या हरकती सूचनांचे दिवस वाया जाण्याची शक्यता आहे. पालिकेने नवी मुंबईकरांवर अन्याय न करता सुटीच्या दिवशीदेखील विभाग कार्यालय सुरू ठेवून हरकती सूचना स्विकाराव्यात अशी मागणी भाजपचे महामंत्री विजय घाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबई पालिकेने विकास आराखडा प्रसिद्ध केल्यावर हरकती, सूचनांसाठी नागरिकांना खुला करण्यात आला आहे. त्यासाठी कायद्यानुसार सहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, मात्र पालिकेकडून विकास आराखड्याबाबत जनजागृती केली जात नसल्याने याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी जरी होत असली तरी कायद्याप्रमाणे 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधी देता येत नाही. ही बाब लक्षात घेत घाटे यांनी आयुक्तांना 60 दिवसांची मुदत ठेवताना ती सरसकट 60 दिवस न ठेवता शासकीय कामकाजाचे 60 दिवस मुदत ठेवावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीला तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मकता दर्शवत शासकीय कामकाजाचे सहा दिवस हरकती सूचनांसाठी केले होते. त्यामुळे विकास आराखड्याचा अभ्यास करणार्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. 31 ऑक्टोबर रोजी हरकती सूचना सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांचे दिवस आले आहेत. पालिकेने निदान नवी मुंबईकरांच्या शहरप्रती असलेल्या भावना लक्षात घेता या सुट्टीच्या दिवशी आठही विभागात अधिकारी बसवून या हरकती सूचनांचा स्वीकार करावा, जेणेकरून मुख्यालयात हरकती सूचना दाखल करणार्यांची गर्दी न होता पालिकेला सुटसुटीतपणे कामकाज करता येईल तसेच विभागनिहाय आलेल्या हरकती थेट विभागनिहाय विभागणी होऊन येतील. त्यासाठी पालिकेने समाज माध्यमांचा वापर करीत जनजागृती करावी. वृत्तपत्रातून जाहिराती अथवा माहिती प्रस्तूत करावी, अशी मागणी भाजपचे विजय घटे यांनी केली आहे.