Breaking News

टीम इंडिया करणार श्रीलंका दौरा

तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर जाणार असून, तेथे तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली.
एका स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली म्हणाला की, जुलैमध्ये आम्ही आयपीएल आयोजित करू शकत नाही. कारण त्या काळात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेत जाईल, जेथे आयसीसी वर्ल्ड सुपर लीग अंतर्गत ते तीन एकदिवसीय सामने खेळतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटची टी-20 मालिका 2019-20मध्ये खेळली गेली होती. त्यात टीम इंडियाने दोन सामने जिंकले होते, तर पहिला सामना रद्द करण्यात आला होता. श्रीलंकेच्या शेवटच्या दौर्‍यावर भारतीय संघाने एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका जिंकल्या होत्या, तसेच निदाहास चषकही जिंकला होता. वर्ल्ड कप 2019मध्ये दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात खेळले होते. तिथे रोहित शर्मा आणि के. एल. राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ मैदानावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.
आयपीएलबाबत जूनपर्यंत निर्णय
आम्ही अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करून ट्वेन्टी-20 विश्वचषकाआधी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहोत. इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या दुसर्‍या टप्प्याच्या आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे. आयपीएल प्रशासकीय मंडळ आणि बीसीसीआय सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतील. जूनच्या मध्यापर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply