Breaking News

राज्यात रखडलेल्या विकासाला गती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदूरबार : प्रतिनिधी
गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे मंदावली होती. त्याला गती देण्याचे काम सध्याच्या सरकारकडून केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 30) नंदूरबार येथे केले. ते नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदूरबार नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. हिना गावीत, राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, किशोर पाटील, मंजुळा गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, चिमणराव पाटील, काशिराम पावरा, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली तसेच विरोधकांवर निशाणा साधला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खास अहिराणी भाषेतून केली. त्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, हे जनतेच्या मनातील सरकार आहे. 2019 साली शिवसेना-भाजपचे सरकार यायला हवे होते. तेच सरकार मागील तीन महिन्यांपूर्वी आलेले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 या काळात अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले, पण दुर्दैवाने कोरोना तसेच इतर कारणांमुळे ही कामे नंतर थांबली होती. या कामांना चालना देण्याचे काम आम्ही केले. गेल्या तीन ते चार महिन्यांत आपण मोठे निर्णय घेतले.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार नगर परिषदेचा नगरविकास विभागाकडे थकीत सात कोटी 28 लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करुन नंदुरबारवासीयांना विशेष भेट दिली.
महाराष्ट्रात मोठे उद्योग येणार
महाराष्ट्रात भविष्यात मोठ मोठे उद्योग येतील आणि राज्याची भरभराट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले. राज्यात टाटा एअरबस प्रकल्पावरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत. योग्य वेळेला मीसुद्धा उत्तर देईन, परंतु भविष्यात राज्यामध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे. राज्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले.
काही लोक आता बांधावर जाताहेत
राज्यात नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकर्‍यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. काही लोक आता बांधावर जात आहेत. ठीक आहे, गेले पाहिजे. शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनीपण, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. या वेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. आज राज्यातील शेतकर्‍यांना आम्ही जी नुकसानभरपाई दिली आहे ती आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी आहे. आमच्या मंत्रिमंडळाने नियम डावलून शेतकर्‍यांना मदत केली आहे. जे शेतकरी निकषात बसत नव्हते त्या शेतकर्‍यांनाही आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सहा हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे त्यांनी आकडे पहावे आणि टीका करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply