नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत 2012मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने दाखल केलेली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी करण्यासाठी वकिलांनी कोर्टाकडे धाव घेतली असून, दोषींविरोधात गुरुवारी (दि. 5) डेथ वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे.
निर्भया प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या यापूर्वीच्या आदेशानुसार चारही दोषींना मंगळवारी (दि. 3) सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार होती, मात्र चौघांपैकी एक असलेल्या पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. त्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या डेथ वॉरंटची अंमलबजावणी राष्ट्रपतींनी निर्णय देईपर्यंत लांबणीवर गेली होती. पवनची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी (दि. 4) फेटाळली. आता आरोपींची फाशी अटळ आहे.