सुधागड ः रामप्रहर वृत्त
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर नसल्याने रात्री वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपघाताचा धोका संभववत होता. रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने या मार्गावर काही छोटे-मोठे अपघातसुद्धा झाले होते, मात्र आता पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने वाहनचालक व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, तसेच मार्गावर सर्व ठिकाणी सूचना व माहिती फलक बसविण्यात आले आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.
-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी