रस्त्यालगत पार्किंग, अरुंद रस्ता, एमआयडीसीच्या वाढत्या वाहतुकीने जाताहेत बळी
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील निजामपूर शहरातून दिघी-माणगाव-पुणे हा महत्वाच्या राज्य मार्ग जातो. त्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे तसेच रस्त्याकडेला असणार्या बेकायदेशीर वाहन पार्किगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्याच महिन्यात निजामपूर बाजारपेठेत एका तरुणाला आपला नाहक जीव गमवावा लागला होता. नियमीत वाहतूक कोंडी, वाढते अपघात यामुळे निजामपूर शहराबाहेरून काढण्यात येणार्या रस्त्याचा (बायपास) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विभागातील प्रमुख बाजारपेठ असणार्या निजामपूर शहरातील अवैध वाहन पार्किंगमुळे वाहनांचे अपघात होत आहेत. काही दिवसांपुर्वी बस स्थानक परिसरात झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाला जीव गमावावा लागला होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात अवैध पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. निजामपूर एसटी स्थानक, बाजारपेठ परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. तसेच वाहनांची मोठी गर्दी होते. हा रस्ता अरूंद असल्यामुळे एकाचवेळी दोन मोठी वाहने आल्यास त्यांना साईडपट्टीचा उपयोग करावा लागतो. त्यातच रस्त्याकडेला उभ्या राहणार्या वाहनांमुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यातच विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात जाणारी व येणारी अवजड वाहने, कर्मचारी व कामगारांना ने-आण करणार्या बस यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. निजामपूर शहरामधून पुणे तसेच मुंबईकडे जाणार्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शॅार्टकट म्हणून वाहनचालक या रस्त्याला पसंती देत आहेत. रुग्णवाहिकादेखील याच मार्गाने मुंबईकडे जात असतात. त्यातच निजामपूर परिसरातील किल्ले मानगड, किल्ले कुर्डुपेठ (विश्रामगड) पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. रायगड किल्लाही येथून फक्त 28 कि.मी. अंतरावर असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक निजामपूर मार्गेच प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे निजामपुरमधील रहदारीचे प्रमाण वाढले आहे. बाजारपेठेतूनच महामार्ग गेल्याने तसेच विळे-भागाड एमआयडीसीमधील कंपन्यांची मालवाहतूक व बसेसदेखील काही प्रमाणात याच मार्गे होत असते. त्यामुळे निजामपूर शहरात नेहमी वाहतूक पहायला मिळत आहे. पुणे बाजूकडून येणारे व जाणारे वाहन चालक आपली वाहने वेगात चालवत असून या रस्त्यालगत शाळा, विद्यालये, आयटीआय व विविध कोर्सेससाठी विद्यार्थी निजामपूर परिसरातूनच नव्हे तर अन्य तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. परिसरातील शेकडो गावातील नागरिक खरेदीसाठी निजामपूर बाजारपेठेत येतात. त्यामुळे निजामपुरमध्ये सतत वाहतूक कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून राज्य रस्ते विकास खात्याकडून निजामपूर शहराबाहेरून बायपास प्रस्तावीत केला होता. त्याची पाहणीही सबंधित अधिकार्यांकडून करण्यात आली होती. तो बायपास रस्ता आजही प्रलंबित आहे. तो रस्ता कधी मंजूर होणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, निजामपूर बायपास रस्त्याबाबत माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र रस्तेविकास महामंडळाचे उपअभियंता निफाडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.