Saturday , December 3 2022

दमदार सुरूवात

शपथविधीनंतर दुसर्‍या दिवशी खातेवाटप जाहीर करीत, देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांची तसेच अर्थमंत्री पदी निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करून मोदी यांनी दुसर्‍या सत्तापर्वातील आपल्या मंत्रिमंडळाला नवा चेहरामोहरा बहाल केला आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात देशोदेशींच्या नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या साक्षीने स्वत: मोदी व त्यांच्या 57 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात प्रशासकीय अनुभव आणि नव्या दमाचे चेहरे अशा दोन्हींची अत्यंत खुबीने सांगड घालत दुसर्‍या सत्ता पर्वाची दमदार सुरूवात केली आहे. आपल्या आधीच्या मंत्रिमंडळातील 7 कॅबिनेट मंत्र्यांना वगळून मोदींनी आपण कठोर निर्णय घ्यायला किंचितही कचरणार नाही याची चुणूक दुसर्‍या पर्वाच्या आरंभीच दाखवली आहे. एकीकडे त्यांनी सुषमा स्वराज, सुरेश प्रभू यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यासह आपल्या जुन्या मंत्रिमंडळातील तब्बल 40 टक्के मंत्र्यांना बदलले तर दुसरीकडे माजी परराष्ट्र व्यवहार सचिव एस. जयशंकर यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करीत सगळ्यांनाच आश्चर्यचकितही केले. आपल्या दुसर्‍या पर्वाची सुरुवात मोदी दमदारपणेच करतील ही अपेक्षा पूर्ण करीत मोदींनी निवड करताना ‘गुणवत्ता’ आणि ‘कार्यक्षमता’ हेच आपले निकष असतील असा स्पष्ट संदेश दिला आहे. नव्या खातेवाटपामुळे निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. मोदींच्या विश्वासू मंत्र्यांपैकी एक व टास्कमास्टर असलेल्या निर्मला यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात आता राजनाथ सिंह संरक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळतील. एस. जयशंकर यांच्या तर निवडीतूनच मोदींनी राजकीय वर्तुळाला एका मोठा धक्का दिला. त्यांच्याकडे परराष्ट्र खात्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवून मोदींनी त्यांचा व आपला परराष्ट्र व्यवहारविषयक दृष्टिकोन मिळताजुळता असल्याचे अधोरेखित केले आहे. राज्यांमध्ये झालेले मंत्रीपदाचे वाटप पाहता 17व्या लोकसभेत सत्ताधारी आघाडीचे सर्वाधिक म्हणजे 64 खासदार पाठवणार्‍या उत्तर प्रदेशला केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. मोदी मंत्रिमंडळातील 57 पैकी 9 मंत्री उत्तर प्रदेशचे असले तरी त्याखालोखालचा क्रमांक महाराष्ट्राने पटकावला आहे. महाराष्ट्राचे या मंत्रिमंडळात 8 मंत्री आहेत तर बिहारच्या पाच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. चालू वर्षात महाराष्ट्रासह हरयाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक केंद्रीय मंत्रीपदे मिळाली आहेत. हरयाणा व झारखंडला अनुक्रमे तीन व दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. महाराष्ट्रातील चौघांकडे कॅबिनट दर्जाचे मंत्रिपद असून यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांचा समावेश आहे. सावंत वगळता अन्य तिघेही याआधीच्या मंत्रिमंडळातही कॅबिनेट मंत्री होते. महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे, संजय धोत्रे व रामदास आठवले हे राज्यमंत्री असणार आहेत. दानवे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशामुळे तसेच भाजपचे ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण असल्यामुळे राज्यातील भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष शोधावा लागणार आहे.

Check Also

कल्याणकारी कौल

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली …

Leave a Reply