खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरने गुरूवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि तो ट्रेलर बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या कडेला थांबला. या अपघातात टे्रलर चालक गंभीर झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
द्रुतगती मार्गावरून चाललेल्या ट्रेलर (एनएल-01, एए-8987) चे ब्रेक गुरुवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ढेकू गावाच्या हद्दीत निकामी झाले. त्यामुळे चालक जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे (वय 36, रा. मध्यप्रदेश) याचे टे्रलरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलरने अज्ञात वाहनाला ठोकर दिली. त्यानंतर बॅरिकेट्स तोडून ट्रेलर थांबला.
या अपघातात ट्रेलर चालक जायरहुसेन गुलबुद्दीन छोट जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता. या अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, मृत्यूंजय देवदूत, आणि लोकमान्य यंत्रणेची अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातामुळे काही काळ बाधित झालेली वाहतूक सुरक्षा यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजीक संस्थेच्या पथकाने सुरळीत केली. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.