कर्जत तहसीलदारांशी केली चर्चा
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी
(दि. 17) कर्जत तहसीलदार कार्यालयात भेट दिली. त्यांनी तहसीलदारांशी या विषयावर चर्चा केली. ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून त्यांनी याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही भेटणार असल्याचे या वेळी सांगितले.
किरीट सोमय्या एका विवाहासाठी कर्जतला आले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी या देवस्थानच्या गैरव्यवहारप्रकरणी कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांची भेट घेतली. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान सेलचे सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस दीपक बेहेरे, किरण ठाकरे, संजय कराळे, प्रमोद पाटील, स्नेहा गोगटे, बिराज पाटकर आदींसमवेत तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांची भेट घेऊन चर्चा केली.
या वेळी किरीट सोमय्या यांनी बोलताना, कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची विक्री धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय अनेक वेळा झाली. हा ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनीही ती जमीन घेतल्याचे निदर्शनात आले आहे, मात्र अचानक तेथे कुणीतरी सलीम बिलाखीया आला. याबाबत मी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही भेटणार आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी मी तहसीलदार शीतल रसाळ यांची भेट घेतली, असे स्पष्ट केले.