Breaking News

नेरळ जंक्शन स्थानकाकडे रेल्वेचे दुर्लक्ष

फलाट निवारा शेडविना, एकच पादचारी पूल

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकातील समस्येकडे बघायला रेल्वे प्रशासनाला वेळ नाही, असे चित्र आहे.कारण या स्थानकातील निम्मा भाग हा निवारा शेड विना आहे. माथेरानला जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरावे लागते, पण येथे एकच पादचारी पूल आहे. तर अनेक वर्षे मागणी करूनही फलाट क्रमांक एकवर स्वच्छतागृह उभारले जात नाही.

नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत प्रवासी सूर्यकांत चंचे यांनी आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. पैसे भरूनही नेरळ रेल्वे स्टेशनमध्ये उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात आणि पावसाळ्यात भर पावसात उभे राहून गाडी पकडण्याची शिक्षा प्रवाशांना मिळत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक आणि पर्यटकांना या स्थानकात उतरुन मिनी ट्रेन पकडावी लागते. फलाटावर पुरेशा लांबीचे छप्पर नसल्याने प्रवाशांना भर उन्हाळ्यात उन्हाचे चटके घेतच ट्रेन पकडावी लागते, तर पावसात प्रवाशांचे हाल जास्त होतात आणि अनेकदा भिजतच ट्रेनमध्ये चढावे लागते. लोकलचे मोजून चार डब्बे सोडले तर उर्वरित फलाटावर शेड नसून, याकडे रेल्वेचे अधिकारी लक्ष देत नाहीत.

वांगणी, शेलू व भिवपुरी रोड या कमी गर्दीच्या स्थानकांवरसुद्धा एकाहून जास्त पादचारी पूल आहेत. तसेच पूर्ण स्थानकांवर छप्पर आहे. परंतु जंक्शन स्थानक असलेले नेरळ मात्र कमनशिबी आहे. 600 मीटर लांबीच्या नेरळ स्टेशनमधील फलाटावर एकच पादचारी पूल असून, तोदेखील स्थानकाच्या एका बाजूला आहे.वरिष्ठ अधिकार्‍यांचा दौरा असेल तेव्हा लाखो रुपये खर्च करून रेल्व स्टेशनमध्ये रंगरंगोटी केली जाते, मात्र प्रवाशांना सोयीसुविधा देण्यात येत नाहीत. फलाट क्रमांक एकवर तर गैरसोयींचा सुकाळ असून, तेथील जागा फक्त मोठमोठ्या जाहिरातीच्या फलकासाठी मोकळी आहे. त्या ठिकाणी कुठेही स्वच्छतागृह नसून प्रवासी संघटना आणि प्रवासी अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनदेखील स्वच्छतागृह बांधून मिळत नाही. फलाट एकवरील प्रवाशांना स्वच्छतागृहाकडे जायचे असेल तर पादचारी पुलाच्या 43 पायर्‍या चढून आणि तेवढ्याच पायर्‍या उतरुन फलाट क्रमांक दोनवर जावे लागते. हा त्रास रेल्वे कमी करणार आहे की, नाही आता सवाल सूर्यकांत चंचे, दिनेश कालेकर यांच्यासारख्या असंख्य प्रवाशांनी केला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply