Breaking News

चई गावातील विजेचे खांब कोसळण्याच्या स्थितीत; महावितरणचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील चई गावात 30 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले विजेचे खांब जिर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी उपस्थित केला आहे.

ओलमण आणि नांदगाव भागातील मोठी लोकवस्ती असलेले गाव म्हणून चई गावाची ओळख असून, त्या गावात आरोग्य विभागाचे उपकेंद्रदेखील आहे. गावातील 200 हुन अधिक घराच्या लोकवस्तीत 1985च्या आसपास वीज पोचली. त्यावेळी लोखंडी खांब उभे करून त्याद्वारे वीज घरोघरी पोहचली. पण विजेचे लोखंडी खांब दरवर्षी सडून जात आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादळात गावातील विजेचे खांब वाकले होते. सद्य परिस्थितीत काही खांब पडण्याच्या स्थितीत आहेत. हे लोखंडी खांब बदलण्याची मागणी चई ग्रामस्थ गेल्या तीन वर्षापासून करीत आहेत. मात्र त्याकडे पाहायला आणि ते खांब बदलायला महावितरण कंपनीला वेळ मिळत नाही.

चई गावात 30 वर्षापूर्वी उभ्या केलेल्या सर्व विजेच्या खांबांचा पायाकडील भाग सडत आहे. तर काही खांबांना मध्येच भोके पडली असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे स्थनिक कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी महावितरणच्या कर्जत कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे. तसेच उपअभियंता आनंद घुले यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. मात्र आजातागत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना चई गावात जायला वेळ मिळाला नाही. सडलेले विजेचे खांब बदलले जात नसल्याने पावसाळ्यात वीज प्रवाह सुरू असताना काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न चई ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

चई गावात 30 वर्षापूर्वी उभे केलेले विजेचे लोखंडी खांब गंजले असून, ते कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी चई गावात येत नाहीत. त्यामुळे आम्ही आता सडलेल्या खांबाच्या पायाजवळ सिमेंट टाकून या खांबांना तात्पुरता आधार देण्याचा विचार करीत आहेत.

-कृष्णा शिंगोळे, भाजप कार्यकर्ते, चई, ता. कर्जत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply